एके दिवशी मैत्रिणीच्या घरी गेले असता टेबल वर एक भलं मोठं पुस्तक पाहिलं, पुस्तकावरती धनुष्य घेतलेल्या एका योध्याचं चित्र होत, म्हणुन सहज हातात घेतलं तेवढ्यात तिथे मैत्रिणीचे बाबा आले. मला म्हणाले," बाळा तुला वाचनाची आवड आहे का" ? मी होकारार्थी मान डोलावली . तेव्हा ते म्हणाले, "खूप छान पुस्तक आहे . तुला वाचायला हवे असल्यास घेऊन जा ". मी म्हटलं, "एवढं मोठं पुस्तक ! मी कधी वाचून पूर्ण करणार काका" ? तेव्हा ते हसून म्हणाले," एकदा वाचायला तर सुरुवात कर". मी पण मग पुस्तक घेऊ घरी आले.
घरी आल्यावर पुस्तक वाचण्यासाठी हातात घेतले. कॉंटिनेंटल प्रकाशन , लेखक शिवाजी सावंत यांची मृत्युंजय हि कादंबरी वाचताना कधी भूक तहान हरपून त्यात गुंतून गेले हे समजलच नाही.
कर्ण हा महाभारतातील एक वीर योद्धा आणि दानशूर एवढंच माहित होतं . पण जस जस पुस्तक चाळत गेले त्यावेळी हे पात्र काळजाला कधी भिडलं ते, कळलंच नाही. हे पुस्तक वाचण्या पूर्वी मला किंवा आपणां सर्वांना महाभारतातील श्री कृष्ण आणि पाच पांडव एवढेच आवडणारे पात्रे. पण लेखक शिवाजी सावंत यांनी आपल्या लेखन शैलीतून सहज सुंदर, काळजाला भिडणारे ओजस्वी लिखाण करून प्रत्येक पात्राला अक्षरशः जिवंत केले आहे . विशेषतः महाभारतात सगळ्यात जास्त अन्याय झालेल्या आणि सदैव दुर्लक्षित केल्या गेलेल्या एका वीर योध्याला आणि तो म्हणजे महावीर दानशूर कर्ण . आणि तो प्रत्यक्ष आपल्याशी मनमोकळे पणाने बोलतोय आपली कर्म कहाणी सांगतोय आणि ते ऐकताना आपल्या डोळ्यांच्या कडा न ओलावतील तर नवलंच .
कर्णाची जन्माचं गुपीत , त्याच बालपण , तारुण्य, तारुण्यातील अर्धांगिनी वृषाली वरच उत्कट प्रेम , आपला अधर्मी मित्र दुर्योधन चुकताना त्याला समझवणारा जरी त्याने ऐकलं नाही तरी त्याची मरणापर्यंत साथ देणारा , इंद्राला दान म्हणून आपली कवच कुंडल देणारा दानशूर, आपल्या जन्माचं गुपित श्री कृष्णाकडून कळल्यानंतर सुद्धा आपल्या मित्राच्या बाजूने ठाम राहणारा, आई कुंती ला अर्जुन सोडून बाकी पांडवांना मृत्यूचं अभयदान देणारा ...... असे किती प्रसंग वाचताना ते जिवंत पणे डोळ्यासमोर उभे राहतात आणि एक एक गोष्ट उलगडत जाताना मी अंतर मनातून श्रीं कृष्णानंतर पार कर्णमयी होऊन गेले. माझ्या मनाच्या कोपऱ्यात कर्ण एक अढळ धृव स्थान घेऊन विराजमान कधी झाला ते कळलंच नाही .
खरंच कर्णाच महाभारतातील योगदान अतुल्य आहे आणि त्याच्या दानशूरत्वाला तोड नाही हेच खरं .
तसेच मृत्युंजय एवढी अमाप लोकप्रियता कुठल्याही मराठी कादंबरी काराच्या पहिल्याच कादंबरीला लाभलेली नाही. म्हणून प्रत्येकाने कर्णाला समजून घेण्यासाठी आयुष्यात एकदातरी मृत्युंजय या कादंबरी ची पान चाळावी .
0 comments: