Friday, August 22, 2014

पाणी……

12:37 AM - By neelvedmaathiche 0

पाणी…… 


सतिश अलीकडच्या काळात खूप विक्षिप्त वागू लागला होता. चिडचिड  करायला लागला होता.  त्यामुळे त्याचं मित्रांशी बोलण हि कमी व्हायला लागलं होत. मध्येच त्याला काय व्हायचं कुणास ठाऊक. वेड लागल्यागत काहीतरी करू लागला होता. सर्वांना त्याच्यामध्ये झालेले बदल जाणवत होते आणि म्हणून त्याला त्याचे मित्र टाळू लागले होते.

तसा सतिश हा सर्वसाधारण मुलगा. दिसायला गोरापान, उंच. अभ्यासात बऱ्यापैकी. मित्रांमध्ये रमणारा, सर्वांच्या मदतीला धावणारा अशी त्याची ओळख. त्याचे आई-बाबा सरकारी नोकरीत उच्च पदस्थ होते. घरी सतिशला कशाचीही कमी नव्हती. कमी होती ती फक्त त्यांच्या सहवासाची. म्हणून जास्तीत जास्त वेळ तो आपल्या मित्रांसमवेत मजेत घालवत  होता. घरात मोजून चार माणस. आई - बाबा, सतिश आणि नोकर…. राधाक्का.

जवळ जवळ वीस वर्षे राधाक्का त्यांच्या घरी घरकाम करत होत्या. त्याचं हि म्हणायला या शहरात दुसर अस कुणी नव्हतंच. सतिशवर त्यांचा खूप जीव होता आणि सतिशसाठी त्याचे आई-बाबा म्हणजे …राधाक्का. स्वतःचे मन मोकळ करण्याचे एकमेव ठिकाण होत ते.

पैसा पैसा करण्याच्या नादात आई-वडिलांचे त्याच्याकडे दुर्लक्षच झाले होते. राधाक्काने त्यांना एक दोन वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण सर्व निष्फळ ठरले होते. त्याचं एकच म्हणण असायचं हे सर्व आम्ही कुणासाठी करतोय त्याच्यासाठीच ना!

एके रात्री सतिशचे आई- बाबा उशीरा घरी आले. चेहऱ्यावरून खूप खुश दिसत होते. फाईल क्लियर करण्यासाठी एका बिल्डर कडून पाच लाख रुपये मिळाल्याचे राधाक्काने अस्पष्ट ऐकले होते.

ऑफिसच्या काही कामानिमित्त एक आठवडा सतिशच्या आईबाबांना बाहेर जाव लागलं. आता घरात फक्त राधाक्का आणि सतिश.

रात्र अमावस्येची, सतिश आपल्या खोलीत निवांत झोपला होता. रात्रीचे दोन वाजले असतील अचानक स्वयंपाक घरातून पाण्याचा ग्लास पडण्याचा आवाज झाला. सतिश दचकून जागा झाला. जाऊन पाहतो तर कुणीच नव्हत. आपल्याला भास झाला असे समजून तो पुन्हा अंथरुणात येऊन पडला. पुन्हा ग्लास पडण्याचा आवाज. त्याच वेळी खिडकी आपोआप उघडली गेली. खोलीचे पडदे वाऱ्याने हलू लागले… आता मात्र सतिशचे हृदय धड धडायला लागले होते. धीर एकवटून तो स्वयपाक घरात गेला तर तिथे राधाक्का पडलेला ग्लास उचलत होती. तहान लागली म्हणून ती तिथे आली होती. डोळ्यावर झापड असल्यामुळे तीच्या हातातून ग्लास पडला होता.

सतिश बेडवर आल्या नंतर परत झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी सतिश उशीराच उठला डोळे चोळत दिवाणखान्यात आला तेवढ्यात फोन खणखणला. राधाक्काच्या नात्यातील कुणीतरी वारल होत हे सांगण्यासाठी कुणीतरी फोन केला होता  त्यामुळे त्यांना गावाला जाण  भाग होत.

"मी सर्व करेन. तू, काळजी करू नकोस. तू निघ आता लवकर." म्हणत सतीश ने राधाक्काला निरोप दिला.

दिवस मित्रांबरोबर मजेत घालवल्यानंतर सतिश रात्री घरी आला. जेवण हॉटेल मधून मागवले. सर्व आवरा -आवर केल्यानंतर तो झोपी गेला.

रात्री अडीचच्या सुमारास वारा जोरदार सुटला होता. अचानक काही खिडक्या आपोआप उघडल्या गेल्या.  पडदे वाऱ्याने  उडू लागले होते. विजा कडाडू लागल्या  होत्या. मध्येच विजांच्या प्रकाशाने चित्रविचित्र आकृत्या आकार घेत होत्या. पाऊस जोरदार सुरु झाला होता. घरात पाणी भरु लागलं होतं. हळूहळू पाण्याने हाताचा आकार घ्यायाल सुरुवात केली तो हात सतिश कडे सरकत होता. त्याचा पाय पकडणार, खेचणार  तेवढ्यात तो किंचाळत जागा झाला. एक अनामिक भीती पायातून सर्कन मस्तकात गेली होती. हृदय भीतीने प्रचंड धडधडायला लागल होत. सर्वांग घामाने तो भिजून गेला. घशाला कोरड पडली होती. आजूबाजूला पाहिलं तर सर्व शांत होत. भितीदायक अस काहीच नव्हत. बाहेर पावसाची रिप रिप मात्र चालू होती.  म्हणजे हे एक स्वप्न होत तर  स्वतःला सावरत तो उठला आणि पाणी पिण्यासाठी स्वयंपाक घराकडे निघाला तरीही थोडी फार धडधड चालू होती.पाणी पिऊन झाल्यानंतर पुन्हा तो बेड पाशी आला पण झोप काही लागत नव्हती. खूप वेळानंतर त्याचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी हि तो उशीराच उठला. घड्याळात पाहीले तर ८:०० वाजले होते. म्हणजे आज सुद्धा कॉलेज ला उशिर म्हणत तो घाई घाईत उठला आणि तयार होऊन कॉलेजला निघाला. नाश्ता तो कॉलेज च्या कॅन्टीन मध्येच करणार होता.

कॉलेज आणि संध्याकाळचे क्लासेस आटोपून तो रात्री आपल्या मित्रांसह घरी आला. कॉलेजचे
काही प्रोजेक्ट्स पूर्ण करण्यासाठी. रात्री बाजूच्या हॉटेल मधून सर्व'मित्रांसाठी त्याने जेवण मागवले. प्रोजेक्ट चे काम आटोपल्यावर सर्व मित्र आपापल्या घरी निघून गेले आणि घरी एकटा राहिला तो सतिश. आज मात्र तो काहीसा विचारातच होता. घरातही एकटाच त्यामुळे त्याच्या मनात घडणाऱ्या घटनांनी, स्वप्नांनी काहूर माजल होत. मनातलं ज्यांच्याशी बोलावं त्या राधाक्का पण नव्हत्या. विचार करता करता शेवटी त्याचा डोळा कधी लागला हे त्याला सुद्धा कळल नाही.

पुन्हा रात्रीची तीच वेळ, पावसाला जोरदार सुरुवात झाली, विजा कडाडू लागल्या, वारा जोरदार वाहू लागला, अचानक खिडक्या उघडल्या गेल्या, रूम मधले पडदे वाऱ्याने हलू लागले, रस्त्यावरचे कुत्रे विचित्र आवाजात भुंकायला लागले. त्या आवाजाने सतिश ला जाग आली. आजूबाजूचं वातावरण, कुत्र्यांचं ते विचित्र भुंकण यामुळे त्याला अनामिक भीती वाटू लागली. पायावरची चादर त्याने डोक्यापर्यंत ओढून घेतली. अचानक पाणी टप टप पडण्याचा आवाज येवू लागला आणि त्याचं क्षणी कुणाच्या तरी हातातून ग्लास पडण्याचा आवाज झाला. आता मात्र सतिश पुरता घाबरून गेला तरीही थोडंस धीर धरून उसन अवसान आणून तो उठला आणि स्वयंपाक घराच्या दिशेने निघाला. पाहतो तर …….पाण्याची एक मनुष्याकृती थेंब थेंब पडलेल्या पाण्यापासून तयार झाली होती आणि ती त्याच्या दिशेने येत होती आणि ते पाहून भेदरलेला सतिश चक्कर येवून खाली पडला.

राधाक्का सकाळी आल्या. बेल वाजवून वाजवून थकल्या शेवटी त्यांनी शेजाऱ्यांना बोलावलं. दरवाजा तोडला गेला. राधाक्काची नजर सतिशला शोधू लागली. स्वयंपाक घरात जाऊन पाहतात तर सतिश जमिनीवर बेशुद्ध पडला होता. राधाक्काने तर हम्बराडाच फोडला. एका शेजाऱ्याने तोंडावर पाणी शिंपडल तसा तो शुद्धीवर आला.
काय घडलं म्हणून राधाक्काने विचारले तर त्याने काही आठवत नाही म्हणत रात्रीचा विषय टाळला. चक्कर येऊन पडल्यामुळे डोक्यालाही थोडी सूज होती म्हणून राधाक्काने फोन करून डॉक्टरांना बोलावले. खूप घाबरल्यामुळे, रक्तदाब वाढल्यामुळे कदाचित चक्कर आली असेल. थोडी डोक्याला सूज आहे मी औषध लिहून देतो म्हणजे सूज उतरेल घाबरायचे काही कारण नाही, डॉक्टरांच्या या बोलण्यामुळे राधाक्काना थोडा धीर आला. डॉक्टर व शेजारी गेल्यानंतर सतिश ने राधाक्काला जवळ बोलावले व घडलेले सर्व सांगितले. हे ऐकून राधाक्काच्या काळजात धस्स झाले. सतिश बोलतोय त्यात काही तरी खर असेल तर हे आक्रीत घडणार थांबायला हवं.

राधाक्काने फोन करून सतिशच्या आई-बाबांना बोलावले व घडलेलं सर्व त्यांना सांगितले.  पण यांवर विश्वास ठेवायला ते तयार होईनात.
सतिश ची तब्येत ठीक नसेल म्हणून कदाचित हे भास होत असतील म्हणून आपण त्याला एखाद्या चांगल्या डॉक्टरांना दाखवू या असे म्हणत राधाक्काचे बोलणे टाळले.

शेवटी राधाक्का म्हणाल्याच, "साहेब, त्या दिवशी बाई साहेबाबरोबर बोलताना तुमचं बोलण चुकून ऐकू आलं. तुम्ही एका बिल्डर कडून फाईल क्लीअर करण्यासाठी काही रुपये घेतलेत. ज्या जागेत या बिल्डरला डेवलपमेंट करायचं आहे तिथे एक विहीर होती. जी खूप वर्षांपासून पाणी टंचाईच्या काळात तेथील लोकांची पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करत होती पण लोकांच्या विरोधाला डावलून तिथे भराव करण्यात आला व विहीर बुजवण्यात आली. साहेब पिण्यासाठी पाणी नाही म्हणून पाणी पाणी करत किती जणांचा जीव गेला असेल हो?"

"साहेब, तुम्ही राग मानू नका पण ज्या दिवसापासून तुम्ही फाईल क्लियर करण्यासाठी पैसे घेतलेत. त्याच्या काही दिवसांपासूनच सतिशच्या बाबतीत हे आक्रीत घडू लागलंय".

"राधाक्का, तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का ? काय बरळत आहात?…. अस काही नसत…. या अंधश्रद्धा आहेत. तुमच्या सारखी अडाणी लोकं अशा नको त्या गोष्टी पसरवता आणि तुम्ही गप्प रहा नाहीतर चालते व्हा इथून ".

"साहेब, माफ करा मी हात जोडते पण अजूनही वेळ गेलेली नाही काहीतरी करा …… नाहीतर खूप मोठी किंमत मोजावी लागेल". अस म्हणत ओलावलेले डोळे पुसत राधाक्का स्वयंपाक घरात गेल्या.

रात्री सतिशच्या किंचाळ्या ऐकून राधाक्का धावत त्याच्या रूम मध्ये गेल्या. मागून त्याचे आई बाबा हि आले. सतिश झोपेत किंचाळत होता. राधाक्काने त्याला उठवले व पाण्याचा ग्लास त्याला दिला तो त्याने भिरकावून लावला. खूप घाबरलेल्या स्थितीत त्याने आईला मिठी मारली. त्याला धीर देण्यासाठी आई म्हणाली, "अरे घाबरू नकोस. वाईट स्वप्न पडलं असेल तुला".

"आई, मला कुणीतरी खोल पाण्यात खेचत होते ग. मी बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतो पण…."

"अरे, ते स्वप्न होत घाबरू नकोस. झोप आता तू" .

सकाळी सतिशच्या बाबांनी डॉक्टरांना बोलावले.. सतिश पाण्याला घाबरतोय हे त्यांना जाणवलं .

"हे बघा, सावंत. तुमचा मुलगा ठीक आहे. फक्त त्याला पाण्याची भीती वाटते. आमच्या भाषेत बोलायचे तर त्याला 'फोबिया' झालाय म्हणजे एखाद्या गोष्टीची प्रचंड भीती. त्याच्या बाबतीत अस काही घडलं होत का ज्यामुळे तो पाण्याला एवढं घाबरतोय".

राधाक्का बोलणार एवढ्यात सतिशच्या बाबांनी त्यांना थांबवलं.

"नाही डॉक्टर. अस काही घडल नाही".

"ठिक आहे. त्याच्यावर लक्ष ठेवा आणि पाण्याची भीती घालवण्याचा प्रयत्न करा पण जबरदस्ती करू नका.  मी तात्पुरती काही औषध लिहून देतो ती मात्र त्याला वेळेवर द्या. तसेच त्याला एखाद्या मानसोपचार तज्ञाला दाखवा. काही असेल तर मला कळवा. येतो मी".

दिवसेंदिवस सतिश खूपच विक्षिप्त वागू लागला होता. एकांत, एकटेपणा त्याला आवडू लागला होता, वेड्यान्सारखा  काही तरी बरळू लागला होता. म्हणून मित्र ही त्याला टाळू लागले होते.

राधाक्काने आता ठरवलं काहीतरी केलच पहिजे. एके दिवशी घरात आई-बाबा नसताना त्या सतिश ला घेवून एका मांत्रिकाकडे गेल्या. त्याने कोणतीतरी पूजा केली आणि सतिशच्या मनगटावर एक मंतरलेला धागा बांधला आणि बजावले निदान दोन महिने तरी याने पाण्याच्या साठ्यापासून म्हणजे तलाव, नदी,समुद्र यापासून दूर राहीले  पाहिजे.

राधाक्का त्याला घेऊन घरी आल्या आणि आई-बाबांना आपण कुठे गेलो होतो हे सांगू नये म्हणून त्याला बजावले.

रात्री आई-बाबा मानसोपचार तज्ञ डॉक्टरांना घेऊन घरी आले.

त्यांनी सतिश ला तपासले त्याच्याशी संवाद साधला.

"सतिश, हे बघ बाळा मी डॉक्टर जोशी, तुला कस वाटतंय आता?"

सतिश डॉक्टरांकडे एक टक बघतच होता.

"हे बघ सतिश, तुला पाण्याची भीती वाटते ना, तशीच प्रत्येकाला कशा न कशाची भीती वाटते. काहीना उन्ची ची भीती, काहींना आगीची, वाऱ्याची, तर बहुतेकांना अंधाराची भीती वाटते. एखाद्या गोष्टीची भीती मनात घर करून बसली की ती लवकर बाहेर पडत नाही.त्यासाठी आपण स्वतः जेवढे प्रयत्न करू तेवढे चांगले. तू पाण्याला घाबरतोस. अरे पण पाणी म्हणजे जीवन. त्याशिवाय आपण जगूच शकत नाही. आपली कोणतीच कामे पाण्याअभावी होवू शकत नाहीत आणि तू या पाण्याला घाबरतोस. काही होत नाही बघ एकदा प्रयत्न कर. तुझी भीती कायमची निघून जाईल. मी आहेच तुझ्या बरोबर."

डॉक्टरांचे हे बोल ऐकून सतिशला  बरे वाटू लागले. त्याने निश्चय केला मनातली हि भीती कायमची काढून टाकायची.

सतिशची प्रकृती आता सुधारत होती. डॉक्टरांनी दिलेल्या धीरामुळे कि मांत्रिकाच्या धाग्यामुळे हा मात्रएक प्रश्नच होता.

आता तो पुन्हा कॉलेज ला जावू लागला होता. मित्रांमध्ये रमू लागला होता.

एके दिवशी त्याला कळल कि त्याच्या ग्रुप मधल्या मित्रांनी पावसाळी पिकनिक आयोजित केली आहे. जंगलातल्या एका धबधब्याखाली मनसोक्त भिजण्यासाठी, धम्माल मस्ती करण्यासाठी.

सतिशने हि ठरवलं कि पिकनिकला जायचं.

आज घरी कुणालाही न सांगता तो पिकनिकला आला होता. हिरवगार डोंगर, हि वनश्री पाहून सगळे हरखून गेले. सतिशला मात्र ते ठिकाण खूप गूढ वाटलं. प्रत्येक जण हिरव्यागर्द वनराईतून वाट काढीत धबधब्याच्या दिशेने निघाले होते. जस जसा धबधबा जवळ येवू लागला तसं तसं त्या जागेची गूढता आणखीनच त्याला जाणवू लागली. तो प्रचंड धबधबा पाहून सतिश थबकलाच. जणू काही तो धबधबा त्याला बोलावत आहे आणि अनामिक ओढीन तो खेचला जातोय अस त्याला जाणवू लागल.

"अरे सतिश, कसला विचार करतोस?"

धबधब्याच्या बाजूला एका मोठ्या खडकावर दारू पिण्यासाठी बसलेल्या मित्रांनी दिलेल्या आवाजाने सतिश भानावर आला.

"ये लवकर, आम्ही वाट  बघतोय तुझी."

खाण पिण झाल्यानंतर सर्व मित्र पोहण्यासाठी पाण्यात उतरले. सतिश मात्र कसल्या तरी विचारात त्या खडकावर बसूनच होता.

" अरे सतिश, लवकर ये. मार उडी. घाबरू नकोस आम्ही आहोत. हे बघ पाणी जास्त नाही. कमरे एवढेच आहे."

आता त्याने मनाशी निश्चय केला. या पाण्याचा तळ गाठायचाच, थांग शोधायचा. पाण्याची हि भीती कायमची घालवायची.

आणि त्याने उडी मारली तळ गाठण्यासाठी  पण त्याच वेळी एका दगडावर हाताचा मनगट घासला गेला व मनगटातील दोरा तुटला गेला. पाण्याचा तळ सापडत नाही म्हणून सतिश ने परत वर येण्याचा प्रयत्न केला पण कुणीतरी आपल्यालाला आत खेचतोय आपल्याला वर येऊ देत नाही हे त्याला जाणवलं. तो जीवाच्या अकांतान्ते पाण्याच्या पृष्ठभागावर पसरलेल्या किरणांच्या दिशेने सर्व शक्ती पणाला लावून वर येण्याचा प्रयत्न करत होता. पण तो खेचला जात होता खूप खूप खोल प्रकाश किरणेही जिथे पोचू शकत नाहीत अशा पाण्याच्या गुढतेच्या दिशेने….

दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रात बातमी आली…. अती मद्यपानामुळे एका तरुणाचा धबधब्याखाली बुडून मृत्यू.

------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखक : निलेश गायकर 

      

Tags:
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Pellentesque volutpat volutpat nibh nec posuere. A die shopuf pogest concludi cum administrasset slushie intus calidum brioche.
Subscribe to this Blog via Email :

0 comments:

back to top